Nagraj Manjule’s upcoming movie Naal.

‘फँड्री’ आणि ‘सैराट’ या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर पुन्हा एकदा झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे एक नवा मराठी चित्रपट घेऊन येत आहेत. ‘नाळ’ असं या आगामी चित्रपटाचं नाव असून या चित्रपटाची निर्मिती स्वत: नागराज मंजुळे करत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज नव्हे तर सुधाकर रेड्डी हे करणार आहेत.

 

‘नाळ’च्या टीझरमध्ये एक लहान मुलगा पाहायला मिळत आहे. या टीझरने प्रेक्षकांची चित्रपटाच्या कथेविषयी उत्सुकता वाढवली आहे हे मात्र नक्की. या चित्रपटातील कलाकारांची माहिती अद्याप गुलदस्त्यातच आहे.या टीजरला सोशल मीडियावर खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातील कलाकारांच्या नावाची घोषणा कधी होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

 

नागराजमंजुळें यांनी या चित्रपटाची माहिती त्यांच्या फेसबुकवर दिली आहे . त्यात त्यांनी असे लिहिले आहे ,”माझ्याच मनातील गोष्ट सुधाकर सांगतोय… नितीन वैद्य, विराज लोंढे, निखिल वराडकर आणि प्रशांत पेठे निर्माणातील सोबती आहेत”.

 

नागराज मंजुळे हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असून तो केवळ दिग्दर्शक नसून लेखक, कवी आणि अभिनेताही आहे. आपल्या प्रत्येक कलाकृतीतून संवेदनशीलतेची जाणीव करून देणारा दिग्दर्शक अशी त्याची ओळख आहे. नाळ या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत आहे तर ‘सैराट’चे कॅमेरामन सुधाकर रेड्डीने चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

 

आता नाळ हा चित्रपट देखील एखाद्या सामाजिक प्रश्नाला वाचा फोडणार अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही. नाळ हा चित्रपट येत्या १६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.