First ever adult movie named “Adults Only” in Marathi.

मिलिंद अरुण कवडे दिग्दर्शित ‘अॅडल्ट्स ओन्ली’ या चित्रपटाची चर्चा सुरुवातीपासून होत आली आहे. कारण या चित्रपटाचे शूटिंग आयफोन 6वर करण्यात येणार आहे.कंडोमच्या पाकिटावर लिहिलेले ‘अ‍ॅडल्ट्स ओन्ली’ आणि फक्त प्रौढांसाठीच अशी जाहिरात करत मिलिंद अरुण कवडे दिग्दर्शित मराठीतील पहिल्या सेक्स कॉमेडी चित्रपटाची जाहिरात केली आहे.

‘येडय़ांची जत्रा’, ‘शिनमा’, ‘१२३४’ सारख्या चित्रपटांनंतर मराठीत ‘अ‍ॅडल्ट्स ओन्ली’ याच नावाने सेक्स कॉमेडीपट घेऊन येत असल्याची, माहिती मिलिंद कवडे यांनी दिली. मात्र हिंदीत ‘सेक्स कॉमेडी’ म्हटल्यानंतर ‘मस्तीजादे’ किंवा ‘क्या कूल है हम’ यासारख्या धाटणीचे चित्रपट येतात. त्या धाटणीतील हा चित्रपट नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आपल्याकडे अजूनही ‘सेक्स’बद्दल किंवा लैंगिकतेच्या एकूण संकल्पनांबद्दलच कमालीचा ढोंगीपणा बाळगला जातो. लैंगिक दृश्ये दाखवणारे चित्रपट किंवा तत्सम विषय आपल्याकडे चवीचवीने चर्चिले जातात, आवडीने पाहिले जातात. मात्र प्रत्यक्षात त्यासंबंधी जेव्हा बोलण्याची वेळ येते, भूमिका घेण्याची वेळ येते तेव्हा हीच मंडळी आपण यातले नाहीच, अशा पद्धतीने वावरतात. लैंगिकतेबद्दल चारचौघात जाहीरपणे बोलणे म्हणजे पाप आहे जणू.. इतक्या ढोंगीपणे लोक वागतात.

adults only, milind arun kawde
Adults Only, Milind Arun Kawde

‘अ‍ॅडल्ट्स ओन्ली’ या चित्रपटातून एकंदरीतच लैंगिक शिक्षण, कुमारवयीन माता याचबरोबर वेश्या व्यवसायावरही भाष्य केले असून अत्यंत बोल्ड विषय तितक्याच बोल्ड पद्धतीने मांडण्यात आला आहे, असेही कवडे यांनी सांगितले. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला १ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असली, तरी चित्रपटाचा टीझर नुकताच फेसबुकवर प्रकाशित करण्यात आला आहे. या टीझरला प्रेक्षकांबरोबरच मराठीतील अनेक कलाकार, दिग्दर्शक अशा नामवंतांकडून दाद मिळाली असली तरी हा बोल्ड चित्रपट नवोदित कलाकारांवर चित्रित होणार आहे, हाही एक विरोधाभास आहे.
मराठीतील चांगल्या गाजलेल्या कलाकारांची लोकांमध्ये एक प्रतिमा असते. त्यामुळे बोल्ड विषयांवरच्या चित्रपटांत काम करायचे म्हणजे त्यांच्या प्रतिमेची त्यांना काळजी असते. त्यामुळे मग त्यांच्याबरोबर काम करताना अनेक र्निबध येतात. म्हणून नावाजलेल्या कलाकारांकडे न जाता नवीन पण रंगभूमीवर काम के लेल्या कलाकारांबरोबर हा चित्रपट करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. मिलिंद कवडे यांनी ‘येडय़ांची जत्रा’ या चित्रपटातून हागणदारीमुक्त झालेल्या गावाचा विषय मांडला होता. ‘शिनमा’मधून दुष्काळाचा तर ‘१२३४’ या चित्रपटातून विस्थापितांचा प्रश्न मांडला होता.

त्याचप्रकारे ‘अ‍ॅडल्ट्स ओन्ली’मधूनही सामाजिक मुद्दाच हलक्याफुलक्या मांडणीतून प्रेक्षकांसमोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याआधी दिग्दर्शक रवी जाधव यांनी ‘बालक पालक’ या चित्रपटातून लैंगिक शिक्षणाचा विषय हाताळला होता. मात्र सेक्स कॉमेडी हा विषय मराठीत पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.