फुगे’ चित्रपटात झळकणार सुबोध आणि मल्हार ची जोडी ! मल्हार कोण तुम्हाला माहिती आहे का ?

‘फुगे’ या सिनेमाच्या नावातच रंजकता असणाऱ्या या चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच मोठी प्रसिद्धी मिळत आहे. दोन जिवलग मित्राच्या घनिष्ट मैत्रीवर आधारित असलेल्या ‘फुगे’ सिनेमामध्ये बापलेकाची जोडीदेखील पाहायला मिळणार आहे. मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे आणि त्याचा मुलगा मल्हार भावे एकत्र झळकणार आहेत. रुपेरी पडद्यावर मल्हारचे हे पदार्पणच आहे असेच म्हणावे लागेल. मल्हार या सिनेमात छोट्या सुबोधच्या भूमिकेत दिसणार असून, स्वप्नील जोशीच्या लहानपणीच्या भूमिकेत विहान निशानदार हा गोंडस मुलगा आहे.
सिनेमाचे सहनिर्माते असणारे जीसिम्सच्या कार्तिक-अर्जुन जोडीमधील कार्तिक निशानदार यांचा विहान मुलगा असून, छोट्या आणि मोठ्या स्वप्नील-सुबोधची ही केमिस्ट्री या दोघांना चांगलीच जमली असल्याचे सिनेमात पाहायला मिळेल. मराठी सिनेजगतात अशा बापलेकांच्या अनेक जोड्या आपल्याला पाहायला मिळतात, पण वडिलांच्या लहानपणाची भूमिका साकारणारा मल्हार हा एकमेव बालकलाकार आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.मैत्रीच्या जगात रमणाऱ्या आणि त्यांच्या कुटुंबांकरीता डोकेदुखी ठरणाऱ्या दोन दोस्तांची केमिस्ट्री ‘फुगे’ मध्ये पाहायला मिळणार आहे. दोन बालमित्र… त्यांच्यातली मैत्री… आणि अचानक येणारा ट्विस्ट! असे बरेच काही या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. सिनेमातील पोस्टरच्या रंगबेरंगी फुग्यांप्रमाणे या सिनेमाचा ट्रेलर देखील कलरफुल आहे. ज्यात एका बाजूला दोन मित्रांची दोस्ती आहे तर दुसरीकडे हळूच फुलणारी लव्हस्टोरी देखील आहे. प्रेम नव्हे तर प्रेमाची बेकस्टोरी सांगणाऱ्या या सिनेमाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे जोशी यांनी केले आहे. या सिनेमाची निर्मिती एस टीव्ही नेटवर्क्ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बऱ्हान, कार्तिक निशानदार तसेच अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी यांनी केली असून इंदर राज कपूर या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहेत. ‘फुगे’ या गमतीशीर नावामुळेच या सिनेमाला प्रदर्शनापूर्वीच मोठी प्रसिद्धी मिळत आहे. तसेच छोट्या आणि मोठ्या स्वप्नील जोशी आणि सुबोध भावेला प्रथमच ऑन स्क्रीन एकत्र पाहण्याची संधी आपल्याला १० फेब्रुवारी रोजी सिनेमा प्रदर्शित झाल्यावर मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published.