Ravi Jadhav’s film ‘Nude’ waiting for approval.

Ravi Jadhav new movie 03

‘न्यूड’ या चित्रपटाला अखिल भारतीय चित्रपट महामंडळने पाठिंबा दिला आहे. परंतु या शिवाय दुसऱ्या कुणीही पाठिंबा दिला नाही अशी खंत दिग्दर्शक रवि जाधव यांनी व्यक्त केली. आता खऱ्या अर्थाने या चित्रपटासाठी संघर्ष सुरू झाला असे देखील त्यांनी एका वाहिनीच्या कार्यक्रमात सांगितले. मराठी-मराठी म्हणणाऱ्या कुणीही समर्थन केले नाही असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे इंडस्ट्रीमधील खूप मोजके लोक त्यांच्या बाजूने उभे आहेत याचे देखील त्यांना खूप वाईट वाटले.

न्यूड चित्रपटाविषयी सांगताना दिग्दर्शक रवि जाधवने म्हटले की, सेन्सॉर बोर्डासोबत जी बैठक झाली त्यामध्ये ते या चित्रपटाबद्दल सकारात्मक असल्याचे दिसून आले.तसेच या चित्रपटाला का नाकारले हे त्यांनाअद्याप समजू शकले नाही. विशेष म्हणजे त्यांना मंत्रालयाकडून किंवा ज्युरीकडून एकही कॉल आला नाही. चित्रपटाला वगळण्यात आल्याची माहिती त्यांना माध्यमातून कळली. तसेच चित्रपट कोणत्या कारणामुळे नाकारला गेला याचे ते स्वतः देखील शोध घेत आहेत.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, ‘न्यूड’ या नावामुळेच चित्रपटाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे असे त्यांचे मत आहे. इफ्फीत हा चित्रपट दाखविण्यासाठी सेन्सॉरच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही हे हि त्यांनी स्पष्ट केले. ‘न्यूड’ हा चित्रपट सेन्सॉरकडून सर्टिफिकेट मिळाले नसल्याने प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. या चित्रपटाला कितीही विरोध होत असला तरी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा दिग्दर्शक आणि निर्मात्यांचा निश्चय पक्का आहे.