‘Home Sweet Home’ starring late actress Reema Lagoo..

नुकताच ‘होम स्वीट होम’ या मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि रिमा लागू या चित्रपटातील मुख्य कलाकार आहेत. दुर्दैवाने रिमा यांनी गेल्या वर्षी या जगाचा निरोप घेतला तरीही या चित्रपटामुळे त्यांचं अस्तित्व कलाकृतींच्या माध्यमातून आजही आपल्यामध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही.

Home sweet Home 02

 

‘होम स्वीट होम’ या चित्रपटाच्या टीझरमध्ये रिमा आणि मोहन जोशी यांच्या नात्याचा गोडवा दिसून येतो. तसेच सुप्रसिद्ध कवी, गीतकार वैभव जोशी यांच्या आवाजातील ‘नात्याचे रुटीन चेकअप’ सांगणारी सुंदर कविता आहे. नात्यात संवादाचे प्रेशर जपणे असेल, खाण्यासंबंधीचे पथ्य असेल, अथवा दाम्पत्यातील खट्याळपणा असेल, अशा सर्वच बाबी टीझरमध्ये कवितेच्या रूपाने सादर केल्या आहेत. ३५ वर्षे एकाच घरात वास्तव्य केलेल्या दाम्पत्याच्या मनात घराविषयी असणारे स्थान या टीझरमध्ये अधोरेखित केले आहे. टीझरच्या शेवटी प्रसाद ओक, विभावरी देशपांडे आणि हृषीकेश जोशी दारातून डोकावताना दिसतात. या अत्यंत हृदयस्पर्शी टीझरमधून ‘होम स्वीट होम’बद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण झाली आहे.

 

Home sweet Home 01

 

‘होम स्वीट होम’ या चित्रपटाद्वारे अभिनेता, लेखक हृषीकेश जोशी दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे. दिवंगत अभिनेत्री रिमा तसेच मोहन जोशी, हृषीकेश जोशी, स्पृहा जोशी, प्रसाद ओक, विभावरी देशपांडे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. हेमंत रुपरेल आणि रणजीत ठाकूर हे चित्रपटाचे निर्माते आहेत. तसेच नितीन प्रकाश वैद्य या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असून आकाश पेंढारकर, विनोद सातव, सचिन नारकर आणि विकास पवार हे प्रस्तुतकर्ते आहेत. आयुष्यात आपल्या घराचं स्थान काय असतं हे विषद करताना जीवनातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकणारा अत्यंत हटके असा ‘होम स्वीट होम’ येत्या २८ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.