‘Vikram …An Institution’ upcoming documentary on veteran actor Vikram Gokhale

Vikram an institution 01

अभिनयाचा वारसा लाभलेल्या विक्रम गोखले या ‘विक्रमी’ कलावंताचा माहितीपट लवकरच प्रेक्षकांना समोर प्रदर्शित होणार आहे. विक्रम गोखले हे मराठीतील दिग्गज कलाकार म्हणून ओळखले जातात. विक्रम गोखले हे वैयक्तिक आयुष्यात अभ्यासू, चोखंदळ आणि शिस्तबध्द कलावंत आहेत. रंगभूमी, मालिका आणि चित्रपटातून आपण त्यांचे अभिनय कौशल्य आजपर्यंत पाहत आलो.

विक्रम गोखले यांच्या घराण्यातच कलावंतशाही आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. विक्रम गोखले यांच्या आजी कमलाबाई गोखले या पहिल्या महिला बालकलाकार तर वडील चंद्रकांत गोखले हे मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील नावाजलेले अभिनेते होते. अशा प्रकारे अभिनयाची गेली १०० वर्षे जुनी परंपरा असणाऱ्या ‘गोखले’ कुटुंबियाचे विक्रम गोखले एक महत्वाचे शिलेदार आहेत.मात्र याच्या जोरावर अभिनयक्षेत्रात पाऊल टाकण्याचा मार्ग त्यांनी कधीच स्वीकारला नाही, तर मराठी, हिंदी आणि गुजराती अशा तीन भाषांमध्ये काम करत विक्रम गोखले यांनी आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली.

विक्रम गोखले यांनी तब्बल ५० वर्षे अभिनयासोबतच सामाजिक बांधिलकीचा वसा देखील जपला आहे . विक्रम गोखले व त्यांचे वडील चंद्रकात गोखले हे दोघे अपंग सैनिक आणि समाजातील उपेक्षितांसाठी मोठ्या आत्मीयतेने कार्य करीत आहेत.

विक्रम गोखले यांच्या कारकीर्दीचा आढावा लवकरच माहितीपटातून घेतला जाणार आहे. थीम्स अनलिमिटेड आणि इंडियन फिल्म स्टुडिओच्या बॅनरअंतर्गत या माहितीपटाचे चित्रिकरण होत असून, योगेश सोमण, आशिष वाघ आणि उत्पल आचार्य या तीन निर्मात्यांनी संयुक्तपणे याची निर्मिती केली आहे, तसेच या माहितीपटाची संकल्पना आणि दिग्दर्शन विवेक वाघ करत आहेत.शेखर ढवळीकर यांनी या माहितीपटाचे लेखन केले असून विक्रम गोखले यांच्या अभिनयाची प्रदीर्घ कारकीर्द रसिकांसमोर सादर केली जाणार आहे.

विक्रम गोखले यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींकडून त्यांचा जीवनप्रवास या माहितीपटाबरोबरच कथित केला जाईल.याशिवाय, खुद्द विक्रम गोखले देखील आपल्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न या माहितीपटातून करताना दिसणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.