Baghtos Kay Mujra Kar Official Trailer Release

मराठी माणुस असं म्हटलं की त्याचं छत्रपती शिवाजी महाराजांवरचं नित्सिम प्रेम आणि आदर प्रथम डोळ्यांसमोर येतं. देवावर जेवढी श्रद्धा आहे तेवढीच श्रद्धा या नावावरही लोकं करतात. पण त्याहून अर्धा टक्का जरी काळजी महाराजांनी मेहनतीने बांधलेल्या गड, किल्ल्यांची घेतली असती तर आज महारांपेक्षा खूश दुसरे कोणीच नसते.

हेमंत ढोमेच्या ‘बघतोस काय मुजरा कर’ या आगामी सिनेमामध्येही काहीसा हाच विषय घेण्यात आला आहे. या सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन हेमंतनेच केलं असून या सिनेमात जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव यांची मुख्य भूमिका आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून उत्तम सिनेमॅटोग्राफीचे दर्शन या काही मिनिटांच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.

यात महाराष्ट्रातले गड किल्ले यांची सध्या झालेली दुरावस्था तर दुसरीकडे इंग्रजांनी जतन केलेल्या त्यांच्या ऐतिहासिक वास्तू यांच्यामधला फरक दाखवला आहे.तसेच सध्या महाराजांचा पुतळा बांधण्यापेक्षा त्यांच्या गड किल्यांचे रक्षण आणि संवर्धन करणे अधिक महत्त्वाचे आहे असा मेसेज या सिनेमातून देण्यात येणार आहे. तीन शीव भक्त एका बाजूला आहेत तर राजकारणी मंडळी एका बाजूला यांच्यातला लढा या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. बघतोस काय मुजरा कर या सिनेमाच्या फेसबुक अकाऊंटवरुन या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा ट्रेलर प्रदर्शित करताना, ‘ज्यांनी केलं शिवबाच्या नावाचं राजकारण त्यांना आता या भूमीत थारा नाही… या वणव्यानंतर महाराष्ट्र कधीच पूर्वीसारखा राहणार नाही! तुमचं आमचं नातं काय… जय जिजाऊ! जय शिवराय!’ असा मेसेजही त्यासोबत लिहिला आहे.

सिनेमाचे काही शूट लंडनमध्येही झाले आहे. त्यामुळे जर संहिता चांगली असेल तर आता मराठी सिनेमाही सातासमुद्रापार सहज जातो हेच यातून दिसून येतंय. प्रथमदर्शनी ट्रेलर बघितल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता वाढतील यात काही शंका नाही. ३ फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे एक चांगल्या विषयाचा सिनेमा प्रेक्षकांना लवकरच पाहता येणार आहे हे मात्र  निश्चित.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.